रविवार, १ नोव्हेंबर, २००९

माझी कल्पना

प्रत्येकाच स्वप्न असत, एका परीचं, स्वप्न सुंदरीच. असच एक माझं स्वप्न. माझी कल्पना.



कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली
कल्पनेच्या कल्पनेने कानशिले तापली

कल्पनाही अल्प जेथे, वर्णिता लावण्य जे
मंजिरीचे पावित्र्य, श्रावणाचे नावीन्य ते
जिची प्रेमकाव्ये मी हृदयी कोरिली
त्या कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली


तृणपर्णासम आहे अंगी जिच्या नम्रता
धावलासही लाजवील अशी चरित्र शुभ्रता
जिची  स्वप्नचित्रे माझ्या नेत्रांनी रेखाटली
त्या कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली


संथ हालचालींनी तिच्या जगविले कामनांना
नेत्र कटाक्षाने मात्र बांध दिला भावनांना
जिच्या केवळ एशाऱ्याने मनातील वादळे ही थांबली
त्या कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली


अर्थ सांगू काय आहे कल्पना संबोधनाचा
तोच एक सूर आहे हृदयाच्या आंदोलनाचा
आठवांनी जिच्या माझी दिवसरात्र व्यापिली
त्या कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली


चालीत जिच्या लय आहे, बोलण्यात सूर आहे
जिच्या मंद स्मितात संजीवनी अंकुर आहे
जिची स्तुती कवने माझ्या मुखाने गायिली
त्या कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली


हिमगौरी वर्ण जिचा, गाली आरक्त लाली
भुवयांच्या मधूनी झाला सूर्योदय जिच्या भाळी
मुक्त केशसंभारी, काळी रेशीम जाळी
सदैव उमललेली ओठांची गुलाबकळी
ईश्वराने जीवनगांठ माझी जिच्यासंगे सांधली
त्या कल्पनेच्या कल्पनेने काया माझी कापली


-- अश्विन

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

२ टिप्पण्या: