शनिवार, २३ जानेवारी, २०१०

नैवेद्य


भटांपुढे नैवेद्य ठेवावा लागला,
तुझ्याही दर्शनासाठी वशिला लावावा लागला

वजन जास्त ज्याच्या हाती, तोच तुला पाही
पाप असो माथ्यावर, वा असो पुण्याई
नाइलाज! पंक्तीभेद करावा लागला

म्हणे दीन कैवारी तू, स्वामी सर्वांचा
तरी कसा मार्ग सोपा वी. आय. पी. जनांचा
मी विशेष कुणीतरी, अभिमान बाळगावा लागला

आणि कुणाच्या तोंडावर झाली, बंद तुझी दारे
उद्या परत रांग, आजचे परिश्रम व्यर्थ सारे
का हा खटाटोप? हिशेब मांडावा लागला

म्हणे असशी तू झोपला, बंद दारामागे
दर्शनार्थी उघड्यावरती रात्रभर जागे
होईल पहाट यावर विश्वास ठेवावा लागला
 
 
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

बुधवार, २० जानेवारी, २०१०

निःश्वास


कृष्णविवरासम कृष्ण अभाळी
                      दोन काजवे मिणमिणणारे
तेवढ्यानेच कसे आश्वस्त
                      घनदाट वनात वाट चुकणारे 


पावला पावला वरती पेरली
                       संकटांची अगणित स्फोटके
भयानकता सूचीत करती
                       मृत्यूची असंख्य द्योतके
कधी विझतील कुणास ठाऊक
                      श्वास त्यांचे पेटणारे


एक काजवा मन-बुद्धीचा
                      आणि दुसरा विश्वासाचा
एक जरी मालवला तरी
                      विचार संपेल निःश्वासाचा
अशा वनातूनी कसे तरतील
                       क्षणाक्षणाला धीर सुटणारे?

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

दोरी

एकदा वाटेत मदाऱ्याच माकड भेटलं मला
झुलत होत फांदीवरती हातांचा करून झुला


गळ्यात होती दोरी, फांदीला बांधलेली
आणि डोळ्यात अव्यक्त व्यथा, स्पष्ट मांडलेली 


मला म्हणाला, बोला साहेब! कसे आहात? चाललंय कसे?
आमचे काय, पारतंत्र्यात उलटेच सदा नशिबाचे फासे


मदाऱ्याच्या तालावरती नाच-नाच नाचतो
जिथे म्हणेल, जश्या म्हणेल तश्या कोल्यांटया मारतो


मनासारखे वागणे आताशा, विसरूनही गेलो
पळण्याच्या  संधी आल्या, पण ऐनवेळी भ्यायलो


अजून पारतंत्र्याची सवय पूर्णही नाही मुरली
जबाबदारीवर स्वातंत्र्य झेलण्याची हिंमतही नाही उरली


माझी अशीच रडगाणी साहेब, तुम्ही कशाला रडता
तुमचं बोला, पोट्यापाण्याच तुम्ही काय करता?


मी म्हणालो, एक मोठ्या कंपनीत, करतो मी नोकरी
माकड्याच्या ओठी कुत्सित हास्य, ते पाहत बसले दोरी



© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

गरज आहे का?

मी August २००८ मध्ये साताऱ्यात गेलो असताना तेथील प्रसिद्ध किल्ल्यावर "अजिंक्यतारा" अशी पाटी वाचली. त्यावर कविता रचण्याचा हा प्रयत्न.

तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?

उभा आहे मी इथे कित्येक सहत्र शके
झेलीत ग्रीष्मज्वर अन पावसाळी धुके
घेतलाय इथल्या प्रत्येक हृदयाचा ठाव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?

घेतलंय मिठीत संपूर्ण सातारा शहर
आणि पाहत आलोय इथल्या प्रत्येक वसंताचा बहर
सगळेच बोलतात माझ्याशी आयुष्याची धूप-छाव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?

चार भिंती, यवतेश्वर आणि कास रोड
फिरून फिरून पायाला आले असतील फोड
इथे आणून मैत्रिणी वर मारला असेल भाव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?

आज जे म्हातारे इथे संध्याकाळी फिरले
लहानपणी तेही माझ्या अंगा खांद्यावर खेळले
इतकं जिव्हाळ्याच नात, मग बस का राव
तरीही गरज आहे का सांगायची माझे नाव?

परवा आला कोणीतरी, अन लावून गेला पाटी
एकच गोष्ट कळली नाही, ती आहे कुणासाठी?
माझ्या नावाची पाटी लावून कुणी स्वतःचा प्रचार केला
आणि परत एकदा जनतेचा पैसा, वाया गेला...


© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.


शनिवार, ९ जानेवारी, २०१०

Dreams


It’s true or fake
But I don’t want to awake
From this melodious dream

It’s good or not
But I don’t want to clot
My emotions flowing through my veins

It’s right or wrong
 But I want to sing the song
To tell my story to the world

She’s mine or not
But I still want her thought
To conquer my brain and heart

It’s big or small
But I want to break the wall
Of uncertainty, between her and me

Its day or night
But I want to ignite
My every pulse with her thoughts

It’s shallow or deep
But I desperately need to sleep
To meet her in my dreams.
 
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni.If you want to send this poem to anyone, Kindly share it with a link to this blog http://mazikalpana.blogspot.com/ as well.

रविवार, ३ जानेवारी, २०१०

काव्य असेच बनत नाही,

काव्य असेच बनत नाही, ते नीट रचावे लागते
हृदयाच्या कणाकणात प्रेम असावे लागते

काव्य असेच बनत नाही, ते मूर्त व्हावे लागत
नयनातल्या प्रतिमेचे वर्णन उत्स्फूर्त यावे लागते

काव्य असेच बनत नाही, त्याला उंची असावी लागते
शब्दाशब्दाला अर्थाची कुंची असावी लागते

काव्य असेच बनत नाही, त्यात भाव असावा लागतो
प्रत्येक ओळीत हृदयाचा घाव असावा लागतो

काव्य असेच बनत नाही, त्यात बोध असावा लागतो
अंधारातून उजेडाचा शोध असावा लागतो

काव्य असेच बनत नाही, त्याची आवड असावी लागते
त्यालाही मग श्रोत्यांची निवड बनावी लागते

-- अश्विन

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.