एकदा वाटेत मदाऱ्याच माकड भेटलं मला
झुलत होत फांदीवरती हातांचा करून झुला
गळ्यात होती दोरी, फांदीला बांधलेली
आणि डोळ्यात अव्यक्त व्यथा, स्पष्ट मांडलेली
आणि डोळ्यात अव्यक्त व्यथा, स्पष्ट मांडलेली
मला म्हणाला, बोला साहेब! कसे आहात? चाललंय कसे?
आमचे काय, पारतंत्र्यात उलटेच सदा नशिबाचे फासे
आमचे काय, पारतंत्र्यात उलटेच सदा नशिबाचे फासे
मदाऱ्याच्या तालावरती नाच-नाच नाचतो
जिथे म्हणेल, जश्या म्हणेल तश्या कोल्यांटया मारतो
जिथे म्हणेल, जश्या म्हणेल तश्या कोल्यांटया मारतो
मनासारखे वागणे आताशा, विसरूनही गेलो
पळण्याच्या संधी आल्या, पण ऐनवेळी भ्यायलो
पळण्याच्या संधी आल्या, पण ऐनवेळी भ्यायलो
अजून पारतंत्र्याची सवय पूर्णही नाही मुरली
जबाबदारीवर स्वातंत्र्य झेलण्याची हिंमतही नाही उरली
जबाबदारीवर स्वातंत्र्य झेलण्याची हिंमतही नाही उरली
माझी अशीच रडगाणी साहेब, तुम्ही कशाला रडता
तुमचं बोला, पोट्यापाण्याच तुम्ही काय करता?
तुमचं बोला, पोट्यापाण्याच तुम्ही काय करता?
मी म्हणालो, एक मोठ्या कंपनीत, करतो मी नोकरी
माकड्याच्या ओठी कुत्सित हास्य, ते पाहत बसले दोरी
माकड्याच्या ओठी कुत्सित हास्य, ते पाहत बसले दोरी
© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा