शनिवार, २६ जानेवारी, २०१३

महाकुंभ


थंडीच्या क्रूर पहाटे, कूकून शिवूनी पडावे वाटे
तरी मनाची श्रद्धा बळकट, चालू लागलो संगम वाटे

वस्त्रावरती वस्त्र वेष्टणे, कातडी, कापडी, लोकरी शाली
तरी मनाला हुडहुड भरती, आणि गोठल्या आठ्या भाळी

संगमावरी श्रद्धा सागर, नजर पोचेतो थांग दिसेना
सागरात थेंब थेंब एकटा, कुणा कुणाचे भान दिसेना

मी पोचलो काठावरती, फक्त स्पर्शलो पवित्र जलाला
एक तीव्र वेदना उठली, चिरत गेली अस्तित्वाला

बर्फाहूनी अतिथंड जल, स्पर्शालाही धैर्य जुटेना
श्रद्धेचीही तीव्र ओढ ती, तरी मनाची भीती हटेना

अल्लख-निरंजन घोष जाहला, वळून पाहिला एक दिगंबर
आधारास खाली धरा अन आवरण म्हणूनी फक्त अंबर

त्यास पाहूनी मलाच भरली, थंडीची अजून धडकी
पण यती तो मग्न स्वतःशीच, त्यास कशाची जाणीवही न हलकी

बेफिकीर तो तसाच शिरला, सुखे अनुभवे जळाचे काटे
स्नान करी तो प्रेमभराने, दुजे मनाला नाही फाटे

भीती न कसली, क्षती न कसली, नाही त्याला कसली जाणीव
जसे त्याच्यामध्ये तोच नसावा, वा भोगी कुठला दिव्य अनुभव

नाही वस्त्र, नाही पैसा, नाही कसली सोय उद्याची
भीती नाही, इच्छा नाही, नाही मना चिंता उद्याची

असा मुक्त तो स्वच्छंदी, जनलज्जेचा भावच नाही
मन मग्न ते दिव्य अनुभवी, देह-बुद्धीची जाणीव नाही

श्रद्धा माझी खोटी भासली, आटापिटा अभिमानाचा
उगाच धडपड महा पुण्याची, कुंभ रितवण्या पापाचा

मला जाणवे मीच अवलिया, बद्ध भीती अन कल्पना जाळी
शोध माझा कधी लागेल का मज? मी पणाची होऊन होळी!



© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक 
http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

मौन

फिकिर कसली?, जिकिर कसली?, मर्यादेची लकिर कसली
सीमा नच मम अस्तित्वाला, बांधेल मज ती जंजीर कसली?


स्वानंदाचे मुक्त धूमारे, स्वप्रेमाचे नित्य फवारे
कधी सरीता मिळे सागरा? सागर कसला? सरीता कसली?



मी तरी का जपावे मजला? जर मी मेल्याने मी सापडतो
धडपड धडपड साध्य न काही, स्वस्थ राहूनी सर्व साधतो



मी आहे माझीच कल्पना, मी नाही माझीच वल्गना
शब्दरीते एक मौनची उरले, मौनवरी दुजा भाव ना

© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni
जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंक 
http://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.