सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

संदेश

 

पाठवले मी संदेश कित्येक लाटा लाटातून

तरी रिते शब्द झाले, सुटका त्रासातून

 

उर भरल्या प्रेमासाठी

जलधि अपुरा पडला

वर्णन तो करू जाता प्रेमाचे

फेस तोंडी उरला

 

कोण तो कुठला? कसली ती व्याप्ती?

अगस्तीचा तो प्याला

आसमंत ही नाही पुरला

प्रेमाच्या अर्थाला

 

दमला, थकला, तो लोटून आला

स्पर्श चरण केले

मी तरीही कोरडा उरलो

त्याला तुला समर्पित केले

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

प्रकाश रेषा

त्या प्रकाशाच्या रेषा 

पाण्यावर अलगद तरंगत

करतात प्रयत्न

पोचायचा माझ्यापाशी


पण हे अंधारे काठ

कुंपण बनून येतात आडवे

आणि तोडतात संपर्क

माझ्या प्रतिभेचा, क्षमतेचा

माझ्या आत्म विश्वासाशी


मग मीही पडून राहतो

त्याच चिर परिचित कुंपणात

माझ्या बुजुर्ग तेचे गोडवे गात

वाट बघत एखाद्या लाटेची

 

January 8th, 2024