मंगळवार, २७ जुलै, २०१०

रस्सीखेच!



रस्सीखेच... सारखी रस्सीखेच
रस्सीखेच... नुसती रस्सीखेच

कधी माग, कधी पुढ, कढी उरी धडधड.. रस्सीखेच

कधी आठवे कोजागरीचा, पूर्ण मुखचंद्रमा
कधी कोर प्रतिपदेची, गालावर लालिमा
असे वाटते थेट भिडावे, मनातले सांगावे
आणि आयुष्याच्या प्रश्नावरती, उत्तर तिला मागावे
मग होकार की नकार, की फक्त प्रश्नार्थक हुंकार 
रस्सीखेच...फक्त रस्सीखेच!

अंदाज घेण्यासाठी केले गुलाब किती बोडके
तरीही किनारा दूरच अजुनी, प्रवाहात होडके


[परीक्षेची भीती कुणाला? कोण तिला घाबरतो?
पण निकालाच्या कल्पनेनेच जीव घाबरा होतो.... ]


हिंमत करतो एकदा आणि विचारतो सरळ जाऊन
हिरवं करशील आयुष्य माझं, पहीला पाऊस होऊन?

पावसासारखीच तीही खट्याळ, जीव आधांतरी टांगते
म्हणते...आषाढ तरी येऊ दे, मग तुला सांगते

आज, उद्या, परवा...
सिग्नल लाल की हिरवा
रस्सीखेच...... मनाची रस्सीखेच!

आषाढात पाऊस आला, वर्षाही झाली प्रेमाची
रुसवे फुगवे आणि प्रेमाच्या, रंगबिरंगी सरींची
खोट रुसणं, मग मिश्किल हसणं, त्याचा योग्य साधून मेळ
तीन माझ्याशी चालू केला, ऊन पावसाचा श्रावण खेळ

खेळ खोटा की खरा... की स्वप्नांचा झरा
रस्सीखेच... चालूच रस्सीखेच!


© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni



जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंकhttp://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.

नसलीस जर तू जवळी


नसलीस जर तू जवळी, बंद कवाडे सगळी 
असता जवळी, पडतील सगळी, बंद कवाडे उघडी

प्रश्न हजार भोवती, प्रत्येकी हजार उत्तरे
हजार वाटा, हजार फाटे, कोडे भलतेच पडे
नसलीस जर तू जवळी, भांभावून जाईन पुरता
असता जवळी, सुटतील सगळी, कोडी बघता बघता

बांधले मजला कोणी, केले बंद कोनाडी
जंजीर पायामध्ये आणि हातामध्ये बेडी
नसलीस जर तू जवळी, मी असहाय हतबल उरतो
असता जवळी बंधनातही मुक्तपणे वावरतो

खजिना कुठे दडलेला. मोह मनाला येतो
मोहामागे पळता पळता, जीव घाबरा होतो
नसलीस जर तू जवळी, मी ही न उरतो माझा
असता जवळी, उणीव कसली? मी जगताचा राजा

आयुष्याचे गणित मांडता, चुकती सगळे ताळे
तरीही न जुळती समीकरणे, कितीही करुनी उजाळे
नसलीस जर तू जवळी, काही सुचत नाही हल्ली
आयुष्य मोठे ताळे आणि तू माझी किल्ली




© Copyrights Reserved Avadhoot Kulkarni

जर ही कविता कुणाला पाठवायची असेल तर कृपया सोबत ह्या ब्लॉगची लिंकhttp://mazikalpana.blogspot.com/ सुद्धा पाठवावी ही विनंती.